ख्रिश्चन धर्म
मागे

स्तोत्रसंहिता 94

तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे

1याहवेह, सूड घेणारे परमेश्वर आहेत, हे सूड घेणारे याहवेह, प्रज्वलित व्हा.

2पृथ्वीच्या न्यायाधीशा उठा; गर्विष्ठांचा यथार्थ सूड घ्या.

3याहवेह, कुठवर दुष्कर्मी, हे दुष्ट कुठवर जयोत्सव करणार?

4ते उन्मत्त शब्दांचा वर्षाव करतात; सर्व दुष्कर्मी बढाईखोरीने भरलेले आहेत.

5हे याहवेह, ते तुमच्या लोकांना तुडवितात; तुमच्या वारसांना ते छळतात.

6ते विधवा, निर्वासितांचा वध करतात; आणि अनाथांचा जीव घेतात;

7ते म्हणतात, “याहवेह पाहत नाहीत; याकोबाचा परमेश्वर लक्ष देत नाही.”

8विचार करा, या लोकांमधील मूर्खांनो; निर्बुद्ध्यांनो, तुम्हाला शहाणपण कधी येणार?

9ज्यांनी कान जडले ते बहिरे आहेत काय? ज्यांनी डोळे घडविले त्यांना दृष्टी नाही काय?

10जे राष्ट्रांना शिस्त लावतात, ते शिक्षा करणार नाहीत काय? जे मानवाला शिक्षण देतात, त्यांना ज्ञानाची कमतरता असेल काय?

11याहवेह मनुष्याचे सर्व विचार जाणतात; ते निरर्थक असतात हे त्यांना ठाऊक आहे.

12याहवेह, धन्य तो पुरुष, ज्याला तुम्ही शिस्त लावता, ज्याला तुम्ही तुमचे विधिनियम देण्यासाठी निवडले आहे;

13जोपर्यंत दुष्टासाठी खाच खोदली जात नाही, तोपर्यंत तुम्ही त्याला विपत्तीपासून विसावा देता.

14याहवेह आपल्या प्रजेचा त्याग करणार नाहीत; त्यांच्या वारसांना ते कधीही टाकणार नाहीत.

15न्यायनिवाडा पुन्हा न्यायीपणानेच होईल, आणि नीतिमान हृदयाचे त्याचे पालन करतील.

16माझ्यातर्फे दुष्ट लोकांविरुद्ध कोण उभा राहील? कुकर्मी लोकांविरुद्ध माझ्याकडून कोण लढेल?

17याहवेहने मला साहाय्य केले नसते, तर मी केव्हाच मरणाच्या निःशब्दतेत निवास केला असता.

18“हे याहवेह, मी घसरत आहे,” असा मी धावा केला, तेव्हा त्यांच्या करुणामय प्रीतीने मला सावरले.

19जेव्हा माझे अंतःकरण व्याकूळ झाले, तेव्हा तुमच्या सांत्वनाने मला हर्षित केले.

20भ्रष्ट सिंहासन तुमच्याशी संघटित होईल काय— जे अन्यायी कायदे लागू करून दुर्दशा करतात?

21दुष्ट नीतिमानाविरुद्ध एकत्र होतात, आणि निरपराध्यास मृत्युदंड देतात.

22परंतु याहवेह माझा दुर्ग झाले आहेत, आणि तेच माझे परमेश्वर, माझ्या आश्रयाचे खडक.

23तेच त्यांच्या दुष्टतेचा सूड घेतील, आणि त्यांच्या दुष्टतेबद्दल त्यांचा नाश करतील; याहवेह आमचे परमेश्वर त्यांचा नायनाट करतील.

स्रोत: Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

WEBREATH · 11:11

«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25

Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.

WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath