ख्रिश्चन धर्म
मागे

फिलिप्पैकरांस 1

तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे

1ख्रिस्त येशूंचे दास पौल व तीमथ्य, यांच्याकडून फिलिप्पै शहरातील ख्रिस्त येशूंमध्ये असणारे सर्व परमेश्वराचे पवित्र लोक, अध्यक्ष व मंडळीचे सेवक यास:

2परमेश्वर आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो.

3जेव्हा मला तुमची आठवण होते त्या प्रत्येक वेळी मी माझ्या परमेश्वराचे आभार मानतो.

4आणि आनंदाने माझ्या सर्व प्रार्थनांमध्ये तुमच्या सर्वांसाठी सतत प्रार्थना करतो

5कारण पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत शुभवार्तेच्या प्रसारात तुम्ही भागीदार झाला आहात.

6माझी खात्री आहे की ज्या परमेश्वराने तुम्हामध्ये चांगले कार्य सुरू केले आहे, त्यास ते ख्रिस्त येशूंच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेतील.

7तुम्हा सर्वांविषयी असा विचार करणे मला योग्य आहे, कारण माझ्या हृदयात तुम्हाला स्थान आहे. मी तुरुंगात होतो अथवा शुभवार्तेची पुष्टी करीत व प्रमाण देत होतो, त्या प्रत्येक वेळी तुम्ही सर्वजण माझ्याबरोबर परमेश्वराच्या कृपेमध्ये सहभागी झाला होता.

8ख्रिस्त येशूंच्या ममतेने मी तुम्हासाठी किती उत्कंठित आहे, याविषयी परमेश्वर साक्षी आहे.

9आणि ही माझी प्रार्थना आहे: तुमची प्रीती ही ज्ञानाने व विवेकाच्या खोलीने अधिकाधिक वाढावी.

10कारण जे उत्तम आहे ते तुम्हाला ओळखता यावे व ख्रिस्ताच्या दिवसासाठी तुम्ही शुद्ध व निर्दोष असावे,

11येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त होणार्‍या नीतिमत्वाच्या फळांनी भरले जावे व त्याद्वारे परमेश्वराची स्तुती आणि गौरव व्हावे.

12आता प्रिय बंधू भगिनींनो, जे माझ्याबाबतीत घडले त्यामुळे प्रत्यक्ष शुभवार्तेच्या कार्यात वाढ झाली आहे हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे.

13याचा परिणाम असा झाला की, राजवाड्यामध्ये असलेले पहारेकरी आणि प्रत्येकास हे स्पष्टपणे माहीत झाले आहे की मी ख्रिस्तासाठी बंधनात आहे.

14आणि माझ्या या बंधनामुळे, येथील बहुतेक बंधू व भगिनींना प्रभूमध्ये धैर्य प्राप्त झाले आहे आणि ते पहिल्यापेक्षा धैर्याने अधिक निर्भयपणे शुभवार्ता जाहीर करत आहेत.

15हे सत्य आहे की, काहीजण हेव्याने आणि वैरभावाने ख्रिस्ताचा प्रचार करतात, परंतु अन्य काही चांगल्या उद्देशाने करतात.

16दुसरे जे आहेत ते प्रीतीमुळे करतात, कारण शुभवार्तेचे समर्थन करण्यासाठी मी येथे आहे, हे त्यांना ठाऊक आहे.

17पण पूर्वीचे जे आहेत ते काहीजण ख्रिस्ताचा प्रचार स्वार्थी महत्त्वाकांक्षेने व अप्रामाणिकपणे करतात, यामुळे येथे मी बंधनात असताना ते माझ्या दुःखात भर घालतात.

18परंतु यापासून काय होते? त्यांचे हेतू खरे असो किंवा खोटे असो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वप्रकारे ख्रिस्ताचा प्रचार होत आहे आणि त्यातच मी आनंद करणार. होय, त्यातच मी आनंद करीत राहीन.

19कारण जे काही मला झाले त्यातून, तुमच्या प्रार्थनेद्वारे आणि येशू ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याच्या पुरवठ्याने माझी सुटका होईल हे मला माहीत आहे.

20याची मला खात्री व अपेक्षा आहे की मी यामुळे लज्जित होऊ नये, तर मला पुरेसे धैर्य प्राप्त व्हावे यासाठी की जगण्याने किंवा मरणाने, आता आणि सर्वदा, ख्रिस्त माझ्या शरीरात उंच केला जावा.

21कारण मला, जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे!

22जर मला हे दैहिक जीवन जगायचे आहे, तर ते माझ्यासाठी श्रमाचे फळ ठरेल. मी काय निवडू? हे मला कळत नाही!

23मी दोन्ही गोष्टीसंबंधाने पेचात आहे: कारण येथून जाऊन ख्रिस्तासोबत असावे, अशी माझी तीव्र इच्छा आहे. तिथे असणे अधिक उत्तम आहे!

24परंतु मी शरीरात असणे हे तुमच्यासाठी अधिक आवश्यक आहे.

25मला माहीत आहे की, तुमची प्रगती आणि विश्वासातील तुमच्या आनंदासाठी मी येथे तुम्हाजवळ राहीन.

26मी तुम्हाला भेटण्यासाठी पुन्हा परत आलो म्हणजे ख्रिस्त येशूंमधील तुमचा माझ्यासंबंधीचा अभिमान भरून वाहू लागेल.

27पण काहीही झाले, तरी ख्रिस्ताच्या शुभवार्तेला साजेल असे तुमचे आचरण ठेवा, म्हणजे मी तुम्हाला पुन्हा येऊन भेटलो अथवा माझ्या अनुपस्थितीत मला तुमच्याबद्दल असे ऐकावयास यावे की तुम्ही एका आत्म्यात स्थिर आहात व विश्वासाच्या शुभवार्तेमध्ये एकत्र झटत आहात,

28पण तुमचे जे विरोधी आहेत त्यांना न घाबरता तुम्ही उभे आहात. कारण त्यांचा नाश हे त्यांना चिन्ह आहे, परंतु तुमचा उद्धार होईल व तोही परमेश्वराद्वारे होईल.

29केवळ ख्रिस्तावर विश्वास ठेवावा, एवढेच नव्हे, तर त्यांच्यासाठी दुःखही सहन करावे हे दान तुम्हाला देण्यात आले आहे.

30पूर्वी मी कसे दुःख सहन केले, हे तुम्ही पाहिलेच आहे व जे मी आता सहन करीत आहे तेही तुम्ही आता ऐकत आहात, व तेच दुःख तुम्हीही आता सहन करीत आहात.

स्रोत: Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

WEBREATH · 11:11

«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25

Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.

WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath