ख्रिश्चन धर्म
मागे

मार्क 6

तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे

1येशू तिथून निघाले व त्यांच्या शिष्यांसह स्वतःच्या गावी परतले.

2शब्बाथ आला त्यावेळी त्यांनी तेथील सभागृहामध्ये असलेल्या लोकांना शिक्षण देण्यास सुरुवात केली आणि ज्या सर्वांनी त्यांचे शिक्षण ऐकले ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, “या मनुष्याला हे कुठून प्राप्त झाले? कशाप्रकारचे हे सुज्ञान त्यांना देण्यात आले आहे? हा अद्भुत चमत्कारसुद्धा कसे करतो?

3हा एक सुतार नाही का? याची आई मरीया आणि याकोब, योसेफ, शिमोन, यहूदाह हे त्याचे भाऊ आहे ना? आणि याच्या बहिणी तर आपल्यातच आहेत ना” आणि ते त्याच्यावर संतापले.

4मग येशू त्यांना म्हणाले, “संदेष्टा सन्मानित होत नाही असे नाही; फक्त आपले गाव आणि आपले घर व नातेवाईक यांच्यात तो मान्यता पावत नाही.”

5काही आजार्‍यांवर हात ठेवून त्यांना बरे करण्याशिवाय तिथे त्यांनी काही चमत्कार केले नाहीत.

6त्यांच्या अविश्वासाबद्धल येशूंना नवल वाटले. येशू बारा शिष्यांना पाठवितात मग येशू गावोगावी शिक्षण देत फिरले.

7त्यांनी बारा प्रेषितांना आपल्याकडे बोलाविले आणि त्यांना जोडीजोडीने बाहेर पाठविण्यास सुरुवात केली आणि त्यांना अशुद्ध आत्म्यांवर अधिकार दिला.

8त्यांनी त्यास सूचना दिली: “प्रवासाला जाताना काठीशिवाय तुमच्यासोबत अन्न, झोळी, कमरपट्ट्यात पैसे असे काहीही घेऊ नका.

9जोडे घाला, पण अतिरिक्त अंगरखा घेऊ नका.

10ज्यावेळी तुम्ही एखाद्या घरामध्ये प्रवेश कराल, त्यावेळी त्या गावातून निघेपर्यंत तिथेच राहा.

11एखाद्या ठिकाणी तुमचे स्वागत झाले नाही किंवा तुमचे ऐकले नाही, तर ते ठिकाण सोडून द्या व तुमच्या पायांची धूळ तिथेच झटकून टाका, ही त्यांच्याविरुद्ध साक्ष राहील.”

12त्याप्रमाणे शिष्य बाहेर पडले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा असा त्यांनी संदेश दिला.

13त्यांनी पुष्कळ भुते काढली, अनेक आजार्‍यांना तैलाभ्यंग केले आणि त्यांना बरे केले.

14हेरोद राजाने याबद्दल ऐकले, कारण येशूंचे नाव सर्वठिकाणी प्रसिद्ध झाले होते. काहीजण म्हणत होते, “बाप्तिस्मा करणारा योहान मरणातून उठला आहे आणि म्हणूनच आश्चर्यकर्म करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये दिसत आहे.”

15आणखी दुसरे म्हणाले, “हा एलीयाह आहे.” तर आणखी काही लोकांनी असा दावा मांडला, “तो प्राचीन संदेष्ट्यांसारखा एक संदेष्टा आहे.”

16परंतु हेरोदाने हे ऐकले, तेव्हा तो म्हणाला, “ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला, तोच पुनः जिवंत झाला आहे!”

17कारण हेरोदाने योहानाला बांधून तुरुंगात टाकण्यासाठी हुकूम दिला होता. हेरोदाने हे यासाठी केले, की त्याचा भाऊ फिलिप्पाची पत्नी हेरोदिया हिच्याशी त्याने विवाह केला होता.

18कारण योहान हेरोदाला म्हणत असे, “आपला भाऊ फिलिप्पाची पत्नी हेरोदिया हिला तू ठेवावे हे नियमाने अयोग्य आहे.”

19यामुळे हेरोदियाने योहानाविरुद्ध डाव धरला होता आणि ती योहानाचा जीव घेण्यास पाहत होती. परंतु ती काही करू शकत नव्हती,

20कारण हेरोद योहानाला भीत असे आणि तो नीतिमान व पवित्र मनुष्य आहे म्हणून त्याचे संरक्षण करत असे. हेरोद योहानाचे बोलणे ऐकून गोंधळात पडत असे; तरी त्याचे ऐकून घ्यावयास त्याला आवडे असे.

21अखेर योग्य समय आला. हेरोदाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने आपल्या दरबारातील मुख्य अधिकारी आणि लष्करातील सेनापती तसेच गालील प्रांतातील प्रमुख नागरिकांना मोठी मेजवानी दिली.

22त्या समारंभात हेरोदियेची कन्या आत आली व नृत्य करून तिने हेरोदाला संतुष्ट केले आणि त्याचबरोबर मेजवानीसाठी आलेल्या इतर पाहुणे मंडळीलाही खुश केले. हेरोद राजाने मुलीला म्हटले, “तुला हवे असेल ते माग आणि ते मी तुला देईन.”

23शपथ घेऊन व वचन देऊन तो तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्याइतके जे काही तू मला मागशील, ते मी तुला देईन.”

24ती बाहेर गेली आणि आपल्या आईला विचारले, “मी काय मागू?” आईने सल्ला दिला, “बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचे शिर माग.”

25घाईघाईने ती मुलगी राजाकडे परत आली आणि त्याला म्हणाली, “मला बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचे शिर तबकात घालून आता हवे आहे.”

26तेव्हा राजा अतिशय अस्वस्थ झाला, पण आपल्या शपथेमुळे आणि भोजनाला आलेल्या पाहुण्यांमुळे तिला नकार देणे त्याला बरे वाटले नाही.

27शेवटी राजाने आपल्या एका शिरच्छेद करणार्‍याला तुरुंगात पाठवून योहानाचे शिर आणण्याची आज्ञा केली. त्या मनुष्याने योहानाचा तुरुंगात शिरच्छेद केला,

28आणि त्याचे शिर तबकात घालून त्या मुलीला दिले व तिने ते आपल्या आईला दिले.

29ही घटना ऐकल्यानंतर, योहानाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शव घेतले आणि कबरेत ठेवले.

30नंतर प्रेषित येशूंभोवती गोळा झाले आणि आपण काय केले व काय शिकविले यासंबंधीचा सर्व वृत्तांत त्यांनी सांगितला.

31नंतर येशूंनी सुचविले, “तुम्ही माझ्याबरोबर या, आपण शांत ठिकाणी जाऊ आणि थोडा विसावा घेऊ.” कारण इतके लोक येजा करीत होते की, त्यांना जेवण करण्यासाठी वेळ मिळाला नाही.

32त्याप्रमाणे होडीत बसून ते एकांतस्थळी गेले.

33अनेकांनी त्यांना जाताना पाहिले व त्यांना ओळखले. तेव्हा नगरातील लोक त्यांच्याकडे पायी आले आणि त्यांच्या आधी तिथे पोहोचले.

34जेव्हा येशू होडीतून उतरले आणि त्यांनी मोठा समुदाय पाहिला, तेव्हा त्यांना त्यांचा कळवळा आला, कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते. येशूंनी त्यांना पुष्कळ गोष्टी शिकविण्यास सुरुवात केली.

35दिवस मावळण्याच्या सुमारास, त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणाले, “ही ओसाड जागा आहे, शिवाय उशीरही होत चालला आहे.

36या लोकांना आसपासच्या गावात जाऊन खाण्यासाठी अन्न विकत घ्यावे म्हणून निरोप द्या.”

37यावर येशू म्हणाले, “तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.” त्यांनी विचारले, “इतक्या लोकांना जेवू घालावयाचे म्हणजे अर्ध्या वर्षाच्या मजुरी पेक्षा अधिक रक्कम खर्च करावी काय?”

38ते म्हणाले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? जा आणि पाहा.” जेव्हा त्यांनी शोधले तेव्हा त्यांना कळले व ते म्हणाले, “पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.”

39मग येशूंनी लोकांना गवतावर गटागटाने बसावयास सांगितले.

40त्याप्रमाणे लोक पन्नास आणि शंभर अशा गटांनी बसले.

41मग येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले आणि स्वर्गाकडे पाहून त्याबद्दल आभार मानले आणि मग त्या भाकरीचे तुकडे करून ते शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले आणि दोन मासळ्यांचेही असेच वाटप केले.

42ते सर्वजण जेवले आणि तृप्त झाले,

43आणि शिष्यांनी उरलेले भाकरीचे तुकडे व मासे गोळा केले त्यावेळी बारा टोपल्या उचलल्या.

44तिथे जेवणार्‍या पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार होती.

45लगेच येशूंनी आपल्या शिष्यांना होडीत बसून पुढे बेथसैदास जाण्यास सांगितले आणि ते स्वतः लोकांना निरोप देण्यासाठी मागे राहिले.

46त्यांना निरोप दिल्यानंतर, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेले.

47रात्र झाली, तेव्हा होडी सरोवराच्या मध्यावर गेली होती आणि ते एकटेच जमिनीवर होते.

48तिथून त्यांनी आपल्या शिष्यांना वल्ही मारणे कठीण जात आहे असे पाहिले, कारण वारा त्यांच्याविरुद्ध दिशेने वाहत होता. पहाटेच्या सुमारास येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आले. ते त्यांना ओलांडून पुढे जाऊ लागले,

49परंतु त्यांनी येशूंना सरोवरावरून चालताना पाहिले, तेव्हा ते भूतच असले पाहिजे असे त्यांना वाटले व ते ओरडले,

50कारण त्या सर्वांनीच त्यांना पाहिले आणि ते फार घाबरले. पण ते त्यांना तत्काळ म्हणाले, “धीर धरा, मीच आहे. भिऊ नका.”

51मग ते त्यांच्याबरोबर होडीत चढले तेव्हा वादळ शांत झाले. शिष्य आश्चर्याने थक्क झाले.

52कारण भाकरी संबंधात त्यांना समजले नव्हते आणि त्यांची हृदये कठीण झाली होती.

53ते पलीकडे गेल्यावर गनेसरेत येथे उतरले व त्यांनी होडी तिथे लावली,

54ते होडीतून उतरले न उतरले तोच, लोकांनी येशूंना ओळखले;

55लोक त्या संपूर्ण परिसरात धावत गेले आणि ते जिथे कुठे आहे असे त्यांनी ऐकले तिथे आजारग्रस्त लोकांना अंथरुणावर घालून त्यांच्याकडे घेऊन गेले.

56आणि जिथे कुठेही येशू गेले—गावात, शहरात—बाजारपेठेत लोक आजार्‍यांना घेऊन जात आणि तुमच्या झग्याच्या काठाला तरी स्पर्श करू द्या अशी त्यांना विनंती करत आणि जितक्यांनी त्यांना स्पर्श केला तितके सर्व बरे झाले.

स्रोत: Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

WEBREATH · 11:11

«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25

Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.

WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath