ख्रिश्चन धर्म
मागे

मत्तय 12

तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे

1शब्बाथाच्या दिवशी येशू धान्याच्या शेतामधून गेले. त्यांच्या शिष्यांना भूक लागली होती म्हणून ते कणसे तोडून खाऊ लागले.

2जेव्हा परूश्यांनी हे पाहिले, ते त्यांना म्हणाले, “पाहा! तुमचे शिष्य शब्बाथ दिवशी जे नियमशास्त्राविरुद्ध आहे ते करतात.”

3येशूंनी उत्तर दिले, “दावीद आणि त्याच्या सोबत्यांना भूक लागली असता त्यांनी काय केले, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?

4तो परमेश्वराच्या मंदिरात गेला, त्याने आणि त्याच्या सोबत्यांनी समर्पित भाकरी खाल्या, हे नियमानुसार नव्हते, त्या केवळ याजकांसाठीच होत्या.

5किंवा, मंदिरात सेवा करीत असलेले याजक शब्बाथ दिवशी काम करून शब्बाथ विटाळवितात तरी ते निर्दोष असतात, हे तुम्ही नियमशास्त्रात वाचले नाही काय?

6मी तुम्हाला सांगतो की मंदिरापेक्षा श्रेष्ठ असलेला एकजण येथे आहे.

7‘मला तुमची अर्पणे नकोत पण दया हवी आहे.’ या शास्त्रवचनाचा अर्थ तुम्हाला समजला असता तर जे दोषी नाहीत त्यांच्यावर आरोप लावला नसता.

8कारण मानवपुत्र हा शब्बाथाचाही प्रभू आहे.”

9नंतर ते तिथून निघाले आणि सभागृहामध्ये गेले.

10तिथे हात वाळून गेलेला एक मनुष्य उपस्थित होता. येशूंवर आरोप सिद्ध व्हावे म्हणून त्यांनी विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे नियमानुसार आहे काय?”

11येशूंनी त्यांना उत्तर दिले, “समजा, तुमच्याजवळ एकच मेंढरू आहे आणि शब्बाथ दिवशी ते विहिरीत पडले, तर तुम्ही त्याला धरून वर काढणार नाही काय?

12मग मेंढरापेक्षा मनुष्य कितीतरी पटीने अधिक मोलवान आहे! म्हणून शब्बाथ दिवशी नियमानुसार चांगले करणे योग्य आहे.”

13मग ते त्या मनुष्याला म्हणाले, “तुझा हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि तो दुसऱ्या हातासारखा अगदी चांगला झाला.

14परंतु परूश्यांनी जाऊन येशूंना जिवे कसे मारता येईल याची योजना आखली.

15परंतु त्यांचा कट येशूंनी जाणला, व ते मंदिरातून निघून गेले. त्यांच्यामागे एक मोठा जनसमुदाय निघाला, आणि येशूंनी सर्व आजार्‍यांना बरे केले.

16त्यांच्याबद्दल इतरांना सांगू नका, अशी त्यांनी लोकांना सूचनाही दिली.

17या घटनेद्वारे यशायाह संदेष्ट्याने येशूंविषयी केलेली भविष्यवाणी पूर्ण झाली; ती अशी:

18“पाहा, हा माझा सेवक, ज्याला मी निवडलेले आहे, जो मला प्रिय आहे, त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे; माझा आत्मा मी त्याच्या ठायी ठेवेन. राष्ट्रांना तो न्याय जाहीर करेल.

19तो भांडणार नाही किंवा आक्रोश करणार नाही. रस्त्यांमध्ये त्याचा आवाज ऐकू येणार नाही.

20जोपर्यंत तो न्याय विजयास आणणार नाही तोपर्यंत चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिणमिणती वात तो विझवणार नाही.

21त्याच्या नावावर सर्व राष्ट्रे आपली आशा ठेवतील.”

22नंतर त्यांनी एका भूतग्रस्त मनुष्याला येशूंकडे आणले, जो आंधळा व मुका होता, आणि येशूंनी त्याला बरे केले, व त्याला बोलता व पाहता येऊ लागले.

23तेव्हा सर्व लोक आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “हाच दावीदाचा पुत्र असेल काय?”

24परंतु हे ऐकल्यावर परूशी लोक म्हणाले, “हा मनुष्य केवळ बालजबूल, जो भुतांचा राजा सैतान, याच्या साहाय्याने भुते घालवितो.”

25त्यांचे विचार येशूंना माहीत होते, आणि ते त्यांना म्हणाले, “प्रत्येक फूट पडलेल्या राज्याचा नाश होतो किंवा एखाद्या शहरातील किंवा घरातील लोकांत आपसात फूट पडली, तर ते शहर किंवा ते घर टिकू शकत नाही.

26जर सैतानच सैतानाला घालवू लागला आणि त्याच्यात फूट पडली, तर त्याचे राज्य कसे टिकेल?

27आणि जर मी बालजबूलाच्या साहाय्याने भुते काढतो, तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? तर मग, ते तुमचे न्यायाधीश असतील.

28परंतु, मी जर परमेश्वराच्या आत्म्याने भुते काढतो, तर परमेश्वराचे राज्य तुमच्यावर आले आहे.

29“किंवा मग, बळकट माणसाच्या घरात प्रवेश करून त्याला आधी बांधल्याशिवाय त्याची मालमत्ता लुटून नेणे कसे शक्य होईल? त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल.

30“जो माझ्याबरोबर नाही तो माझ्याविरुद्ध आहे, आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो विखुरतो.

31आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक प्रकारचे पाप किंवा निंदा यांची क्षमा होऊ शकेल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध केलेल्या निंदेची क्षमा होणार नाही.

32जो कोणी मानवपुत्राच्या विरुद्ध बोलेल त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करेल, त्याला या युगात आणि येणार्‍या युगात कधीही क्षमा होणार नाही.

33“जर झाड चांगले असेल तर त्याचे फळ देखील चांगले असते आणि जर झाड चांगले नसेल तर त्याचे फळ देखील चांगले नसते. झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते.

34अहो सापांच्या पिलांनो! तुमच्यासारख्या दुष्टांना चांगले आणि यथायोग्य कसे बोलता येईल? कारण अंतःकरणात जे भरलेले आहे तेच मुखातून बाहेर पडते.

35चांगला मनुष्य आपल्यात साठविलेल्या चांगल्या गोष्टी बाहेर काढतो, तर दुष्ट मनुष्य वाईटाने भरलेल्या साठ्यातून वाईटच बाहेर काढतो.

36मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक निरर्थक शब्दाबद्दल जाब द्यावा लागणार आहे.

37कारण तुमच्या शब्दांवरूनच तुम्ही निर्दोष ठराल, किंवा तुमच्या शब्दांवरूनच तुम्ही दोषी ठराल.”

38मग परूशी व नियमशास्त्र शिक्षक यांच्यापैकी काही येशूंना म्हणाले, “गुरुजी, तुमच्याकडून आम्हास चिन्ह पाहायचे आहे.”

39येशू त्यांना म्हणाले, “दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते! परंतु योनाह संदेष्ट्याच्या चिन्हाखेरीज दुसरे कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही.

40कारण ज्याप्रमाणे योनाह मोठ्या माशाच्या पोटात तीन दिवस आणि तीन रात्री राहिला, तसेच मानवपुत्र, भूमीच्या पोटात तीन दिवस आणि तीन रात्री राहील.

41न्यायाच्या दिवशी निनवेहचे लोक उठून या पिढीला दोषी ठरवतील, कारण योनाहचा उपदेश ऐकून त्यांनी पश्चात्ताप केला; आणि पाहा, योनाहपेक्षाही श्रेष्ठ असा एकजण येथे आहे.

42दक्षिणेची राणी न्यायकाळी या पिढीबरोबर उठेल आणि त्यांना दंडपात्र ठरवेल, कारण ती शलोमोनाचे ज्ञान ऐकण्यास पृथ्वीच्या टोकाकडून आली; आणि पाहा, आता तर शलोमोनापेक्षा थोर असा कोणी येथे आहे.

43“एखाद्या मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला, म्हणजे तो रुक्ष ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी जागा शोधतो, आणि ती त्याला सापडत नाही,

44त्यावेळी तो म्हणतो, ‘जे घर मी सोडले, तिथे परत जाईन.’ तो परत आला म्हणजे त्याला ते घर रिकामे, झाडून स्वच्छ केलेले व व्यवस्थित ठेवलेले असे आढळते.

45नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा अधिक दुष्ट असे आणखी सात दुरात्मे आपल्याबरोबर घेऊन येतो व ते आत जाऊन तिथे राहतात, आणि मग त्या मनुष्याची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते. तसेच या दुष्ट पिढीचे होईल.”

46येशू समुहाशी बोलत असताना त्यांची आई आणि भाऊ त्यांच्याशी बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते.

47कोणी त्यांना सांगितले, “तुमची आई आणि तुमचे भाऊ बाहेर उभे आहेत व आपल्याशी बोलू इच्छित आहेत.”

48त्यांनी त्याला उत्तर दिले, “कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ?”

49मग आपल्या शिष्यांकडे बोट दाखवित ते म्हणाले, “हे माझी आई आणि माझे भाऊ आहेत.

50ते पुढे म्हणाले, जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि माझी आई आहे.”

स्रोत: Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

WEBREATH · 11:11

«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25

Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.

WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath