प्रेषित 8
तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे
1स्तेफनाच्या वधाला शौलाने मान्यता दिली. ख्रिस्ती लोकांचा छळ आणि पांगापांग त्या दिवसापासून यरुशलेम येथील मंडळीचा मोठा छळ सुरू झाला आणि प्रेषितांशिवाय सर्व विश्वासणारे यहूदीया व शोमरोन या प्रांतात पांगले.
2भक्तिमान लोकांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी मोठा शोक केला
3परंतु शौलाने मंडळीचा नाश करण्यास सुरुवात केली. तो घरोघरी जाऊन, स्त्री व पुरुष दोघांनाही खेचून तुरुंगात घालीत असे.
4आता जे पांगलेले होते त्यांनी जिथे कुठे ते गेले तिथे शुभवार्तेच्या वचनाचा प्रसार केला.
5फिलिप्प खाली शोमरोनातील एका शहरात गेला आणि त्याने ख्रिस्ताबद्दल घोषणा केली.
6ज्यावेळी समुदायाने फिलिप्पाचे ऐकले व त्याने केलेली चिन्हे पाहिली, सर्वांनी त्याच्या म्हणण्याकडे बारकाईने लक्ष दिले.
7अनेक अशुद्ध आत्मे किंकाळी मारून निघून जात आणि अनेक पक्षघाती व पांगळे लोक बरे होत असत.
8त्या शहरात मोठा आनंद झाला होता.
9आता काही काळापर्यंत शिमोन नावाचा एक मनुष्य जादूटोणा करीत होता आणि त्याने शोमरोन शहरातील लोकांना चकित करून सोडले होते व तो आपण कोणी फार मोठे आहोत अशी फुशारकी मारीत असे.
10म्हणून सर्व उच्च व नीच लोक त्याच्याकडे लक्ष देत होते व जिला “परमेश्वराची महाशक्ती म्हणतात तो खरोखर हाच मनुष्य असला पाहिजे,” असे उद्गार काढीत होते.
11ते त्याच्यामागे जात होते कारण बराच काळापासून जादूटोणा करून त्याने त्यांना थक्क केले होते.
12परंतु जेव्हा लोकांनी परमेश्वराच्या राज्याची शुभवार्ता व येशू ख्रिस्ताचे नाव याबद्दलचा संदेश फिलिप्पाकडून ऐकला आणि त्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पुरुषांना व स्त्रियांना दोघांनाही बाप्तिस्मा देण्यात आला.
13शिमोनाने देखील विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा झाला. आता फिलिप्प जिथे जात असे तिथे तो त्याच्यामागे जाऊ लागला आणि चमत्कार व चिन्हे पाहून तो आश्चर्य करू लागला.
14यरुशलेममधील प्रेषितांनी जेव्हा शोमरोनातील लोकांनी परमेश्वराचे वचन स्वीकारल्याचे ऐकले, तेव्हा त्यांनी पेत्र व योहानाला शोमरोनात पाठविले.
15ते तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी तेथील नवीन विश्वासणार्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना केली,
16कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही पवित्र आत्मा आलेला नव्हता; केवळ प्रभू येशूंच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा झाला होता.
17मग पेत्र व योहानाने आपले हात त्यांच्यावर ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला.
18शिमोनाने पाहिले की प्रेषितांनी हात ठेवले म्हणजे पवित्र आत्म्याचे दान मिळते, तेव्हा त्याने प्रेषितांना पैसे देऊ केले
19आणि म्हणाला, “मला देखील हे सामर्थ्य मिळू द्या म्हणजे ज्या कोणावर मी आपले हात ठेवेन तेव्हा त्यांना पवित्र आत्मा लाभेल.”
20पेत्राने उत्तर दिले: “तुझ्या पैशांचा तुझ्याबरोबर नाश होवो, कारण परमेश्वराचे दान पैशाने विकत घेता येईल असा तू विचार केला!
21या सेवेत तुला भाग किंवा सहभाग नाही, कारण तुझे हृदय परमेश्वराच्या दृष्टीने बरोबर नाही.
22तू तुझ्या या दुष्टतेबद्दल पश्चात्ताप कर आणि प्रभूकडे प्रार्थना कर, या आशेने की, कदाचित ते तुझ्या हृदयातील विचारांबद्दल तुला क्षमा करतील;
23कारण तू कडूपणाने भरलेला आणि पापाचा दास आहेस असे मला दिसते.”
24तेव्हा शिमोन म्हणाला, “तुम्ही सांगितलेल्या या गोष्टी मजवर येऊ नयेत, यासाठी प्रभूला विनवणी करा.”
25आणखी प्रभूचे वचन गाजवून व येशूंबद्दल साक्ष देऊन पेत्र व योहान यरुशलेमला परतले. परत जाताना रस्त्याने शोमरोनातील अनेक खेड्यांमध्ये थांबून त्यांनी तेथील लोकांना शुभवार्ता सांगितली.
26आता प्रभूच्या दूताने फिलिप्पाला म्हटले, “ऊठ दक्षिणेकडील रस्त्यावर जा, तो वाळवंटातून जाणारा रस्ता यरुशलेमपासून गाझाकडे जातो.”
27तेव्हा तो निघाला आणि जात असताना रस्त्यावर त्याला इथिओपिया देशाचा एक षंढ भेटला, हा षंढ इथिओपियाची राणी कांदकेचा महत्त्वाचा अधिकारी व खजिनदार होता. हा मनुष्य यरुशलेमला आराधना करण्यासाठी आला होता,
28आणि आता घरी परत जात असताना तो त्याच्या रथामध्ये बसून यशायाह संदेष्ट्याचा ग्रंथ वाचीत होता.
29तेव्हा पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “तू रथ गाठ आणि त्याच्या जवळच चालत राहा.”
30मग फिलिप्प धावत रथापर्यंत गेला आणि तो खोजा यशायाह संदेष्ट्याचा ग्रंथ वाचीत होता. ते ऐकून त्याने त्याला विचारले, “आपण जे वाचत आहात ते आपणास समजते काय?”
31तो म्हणाला, “कोणीतरी स्पष्टीकरण करून सांगितल्याशिवाय हे मला कसे समजेल?” म्हणून त्याने फिलिप्पाला विनंती केली की, त्याने रथात चढून त्याच्याजवळ बसावे.
32शास्त्रलेखातील जो उतारा तो षंढ वाचीत होता तो असा होता: “वधावयाला नेणाऱ्या कोकराप्रमाणे त्याला नेण्यात आले, आणि लोकर कातरणार्यांसमोर मेंढरू जसे स्तब्ध राहते, तसेच त्याने आपले मुख उघडले नाही.
33त्याच्या लीन अवस्थेत तो न्यायापासून वंचित राहिला. त्याच्या वंशजांबद्दल कोण बोलू शकेल? कारण त्याचे जीवन पृथ्वीवरून काढून घेण्यात आले होते.”
34षंढाने फिलिप्पाला विचारले, “संदेष्टा कोणाविषयी बोलत आहे, स्वतःविषयी किंवा दुसर्या कोणाविषयी?”
35तेव्हा फिलिप्पाने त्याच शास्त्रलेखापासून सुरुवात करून त्याला येशूंची शुभवार्ता सांगितली.
36तसेच पुढे प्रवास करीत असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका जलाशयाजवळ ते आले आणि त्याचवेळेस षंढ म्हणाला, “पाहा, येथे पाणी आहे. माझा बाप्तिस्मा होण्यासाठी काही अडचण आहे काय?”
37फिलिप्पाने उत्तर दिले, “आपण पूर्ण अंतःकरणाने विश्वास धरीत असाल, तर आपला बाप्तिस्मा होऊ शकतो.” आणि षंढाने उत्तर दिले, “येशू ख्रिस्त हे परमेश्वराचे पुत्र आहेत असा मी विश्वास ठेवतो.”
38मग त्याने रथ थांबविण्यास सांगितले आणि फिलिप्प व षंढ दोघेही खाली पाण्यात उतरले आणि फिलिप्पाने त्याला बाप्तिस्मा दिला.
39ते पाण्यातून वर आले, तेव्हा प्रभूच्या आत्म्याने एकाएकी फिलिप्पाला उचलून नेले आणि त्या षंढाला तो पुन्हा कधीही दिसला नाही. तो आनंद करीत त्याच्या मार्गाने पुढे निघून गेला.
40फिलिप्प, अजोत या शहरात दिसून आला आणि पुढे प्रवास करीत कैसरीया येथे पोहोचेपर्यंत त्याला वाटेत लागलेल्या सर्व गावांमध्ये त्याने शुभवार्ता सांगितली.
WEBREATH · 11:11
«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25
Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.
WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath