ख्रिश्चन धर्म
मागे

2 शमुवेल 19

तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे

1“अबशालोमसाठी राजा रडत आहे आणि शोक करीत आहे हे योआबाला सांगण्यात आले.”

2आणि त्या दिवशी संपूर्ण सैन्याचा विजय, शोकात बदलला, कारण त्या दिवशी त्या सैन्याने ऐकले, “राजा आपल्या पुत्रासाठी शोक करीत आहे.”

3युद्ध सोडून पळून जाणारी माणसे जशी लज्जित होऊन चोरपावलांनी परत येतात तशी ती माणसे लपतच शहरात गेली.

4तेव्हा राजाने आपला चेहरा झाकला आणि मोठ्याने रडला, “हे माझ्या पुत्रा, अबशालोमा! हे अबशालोमा माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा!”

5नंतर योआब घरात राजाकडे गेला आणि म्हणाला, “आज तुम्ही तुमच्या सर्व सैन्याला अपमानित केले आहे, ज्यांनी तुमचा जीव वाचविला आणि तुमची मुले, मुली, तुमच्या पत्नी व उपपत्नींना वाचविले आहेत.

6तुमचा द्वेष करणार्‍यांवर तुम्ही प्रेम करता आणि तुमच्यावर प्रेम करणार्‍यांचा तुम्ही द्वेष करता. आज तुम्ही हे स्पष्ट केले आहे की, सेनापती आणि त्यांची माणसे यांचे तुम्हाला काही वाटत नाही. मला तर असे वाटते की आज जर आम्ही सर्व मेलो असतो आणि अबशालोम जिवंत असता तर तुम्हाला आनंद झाला असता.

7तर आता बाहेर जा आणि तुमच्या माणसांना उत्तेजित करा. मी जिवंत याहवेहची शपथ घेऊन सांगतो की, तुम्ही बाहेर गेला नाही, तर आज रात्र येईपर्यंत तुमच्याजवळ एकही मनुष्य असणार नाही. तुमच्या तारुण्यापासून आजपर्यंत जी सर्व अरिष्टे तुमच्यावर आली त्यापेक्षा हे तुमच्यासाठी अधिक वाईट असे होईल.”

8तेव्हा राजा उठला आणि शहराच्या वेशीकडे आपल्या स्थानी जाऊन बसला. जेव्हा माणसांना सांगण्यात आले, “राजा वेशीकडे बसला आहे,” तेव्हा ते सर्वजण त्याच्यासमोर आले. या दरम्यान इस्राएली लोक त्यांच्या घरांकडे पळून गेले.

9इस्राएलच्या सर्व गोत्रातील लोकांचा आपसात वाद चालू होता, ते म्हणत होते, “राजाने आम्हाला आमच्या शत्रूच्या हातातून सोडविले आहे; तोच आहे ज्याने पलिष्ट्यांच्या हातातून आमची सुटका केली. परंतु आता अबशालोममुळे तो देशातून पळून गेला आहे;

10आणि अबशालोम ज्याला आम्ही आमच्यावर राज्य करण्यासाठी अभिषेक केला, तो युद्धात मारला गेला आहे. तेव्हा राजाला परत आणण्याविषयी तुम्ही काहीच का बोलत नाही?”

11दावीद राजाने सादोक आणि अबीयाथार याजकांना निरोप पाठवला: “यहूदीयाच्या वडीलजनांना विचारा, ‘जे सर्व इस्राएलात बोलले जात आहे ते राजाच्या कानी आले आहे, तर राजाला त्याच्या राजवाड्यात आणण्यास तुम्ही सर्वात शेवटचे का आहात?

12तुम्ही माझे नातेवाईक आहात, माझ्या हाडामांसाचे आहात. तेव्हा राजाला परत आणण्यास तुम्ही मागे का असावे?’

13आणि अमासाला असे म्हणा, ‘तू माझ्या हाडामांसाचा नाहीस काय? योआबाच्या जागी तू माझ्या सैन्याचा सेनापती झाला नाहीस तर परमेश्वर मला अधिक कठोर शिक्षा करो.’ ”

14अशाप्रकारे दावीदाने यहूदाह गोत्राच्या लोकांची मने जिंकून त्यांना एकमत केले. त्यांनी राजाकडे निरोप पाठवला, “तुम्ही आणि तुमची सर्व माणसे, परत या.”

15नंतर राजा परतला आणि यार्देनपर्यंत गेला. यहूदाहचे लोक गिलगाल येथे राजाला भेटण्यास आणि त्यांना यार्देनेच्या पार नेण्यास आले.

16यहूदीयाच्या लोकांबरोबर बहूरीम येथील बिन्यामीन गोत्रातील, गेराचा पुत्र शिमी हा सुद्धा घाईने दावीद राजाला भेटण्यासाठी गेला.

17त्याच्याबरोबर बिन्यामीन कुळातील एक हजार माणसे होती, त्याचप्रमाणे शौलाच्या घराचा कारभारी सीबा आणि त्याचे पंधरा पुत्र आणि वीस सेवक हे त्याच्याबरोबर होते. यार्देनेकडे जिथे राजा होता तिथे ते घाईने गेले.

18राजाच्या घराण्याला घेण्यासाठी आणि राजाला हवे त्याप्रमाणे करण्यास, ते नदीचे पात्र पार करून आले. जेव्हा गेराचा पुत्र शिमी यार्देन पार करून आला, तेव्हा त्याने राजासमोर दंडवत घातले.

19आणि तो राजाला म्हणाला, “माझ्या स्वामीने माझा दोष मोजू नये. माझ्या स्वामीने ज्या दिवशी यरुशलेम सोडले, तेव्हा आपल्या दासाने केलेल्या वाईट कृत्याचे आपण स्मरण करू नये. राजाने ते आपल्या मनातून काढून टाकावे.

20कारण आपल्या सेवकाला (म्हणजे मला) माहीत आहे की, मी पाप केले आहे, परंतु आज योसेफाच्या गोत्रातील मी पहिलाच माझ्या स्वामीस भेटावयास आलो आहे.”

21तेव्हा जेरुइयाहचा पुत्र अबीशाई म्हणाला, “शिमीने याहवेहच्या अभिषिक्ताला शाप दिला यामुळे शिमीला जिवे मारावे की नाही?”

22तेव्हा दावीद म्हणाला, “जेरुइयाहच्या पुत्रांनो, तुम्हाला त्याचे काय? तुम्हाला लुडबुड करण्याचा अधिकार कोणी दिला? इस्राएलमध्ये आज कोणाचा मृत्यू व्हावा काय? आज मी इस्राएलचा राजा आहे हे मला समजत नाही काय?”

23तेव्हा राजाने शिमीला म्हटले, “तू मरणार नाहीस.” आणि राजाने त्याला शपथ घेऊन अभिवचन दिले.

24शौलाचा नातू, मेफीबोशेथ सुद्धा राजाला भेटण्यास गेला. राजा यरुशलेम सोडून गेल्यापासून सुरक्षित परत येईपर्यंत त्याने आपल्या पायांची काळजी घेतली नव्हती, किंवा दाढी केली नव्हती किंवा कपडे धुतले नव्हते.

25जेव्हा तो यरुशलेमातून राजाला भेटायला आला, त्याला राजाने विचारले, “मेफीबोशेथ, तू माझ्याबरोबर का आला नाहीस?”

26तो म्हणाला, “माझ्या स्वामी, मी आपला सेवक अपंग आहे, मी म्हणालो, ‘मी माझ्या गाढवावर खोगीर घालून त्यावर बसून माझ्या राजाबरोबर जाईन.’ परंतु माझा सेवक सीबा याने मला फसविले.

27परंतु त्याने आपल्या सेवकाविषयी माझ्या स्वामीला खोटे सांगितले. माझे स्वामी तर परमेश्वराच्या दूताप्रमाणे आहेत; म्हणून आपणास जे योग्य वाटेल ते आपण करावे.

28माझ्या आजोबांचे सर्व वारसदार माझ्या स्वामीकडून मरणास पात्र होते, परंतु आपण आपल्या सेवकाला आपल्या मेजावर बसणार्‍यांसह पंक्तीस बसविले. त्यामुळे राजासमोर आणखी काही विनंती करण्याचा मला काय अधिकार आहे?”

29राजाने त्याला म्हटले, “आणखी काही का बोलावे? माझी आज्ञा आहे की तू व सीबाने जमीन वाटून घ्यावी.”

30मेफीबोशेथ राजाला म्हणाला, “ती सर्व जमीन सीबालाच देऊन टाका, आता माझे स्वामी सुखरुप आले आहे.”

31बारजिल्लई गिलआदी हा सुद्धा रोगलीम येथून दावीद राजाबरोबर यार्देन पार करून देण्यास आणि तिथून त्यांना त्यांच्या मार्गी लावण्यास आला होता.

32बारजिल्लई फार उतार वयाचा झाला होता, तो ऐंशी वर्षाचा होता. महनाईम येथे असताना त्याने राजाला सामुग्री पुरविली होती, कारण तो फार धनवान मनुष्य होता.

33राजाने बारजिल्लईस म्हटले, “माझ्याबरोबर पार चल आणि यरुशलेममध्ये माझ्याजवळ राहा आणि मी तुझे पालनपोषण करेन.”

34पण बारजिल्लईने राजाला उत्तर दिले, “मी अजून किती वर्षे जगणार, की मी राजाबरोबर यरुशलेमास जावे?

35मी ऐंशी वर्षाचा आहे. कोणत्या गोष्टी मला आनंद देतील आणि कोणत्या नाही यातील फरक मला सांगता येईल काय? आपला सेवक जे काही खातो किंवा पितो याची चव तरी त्याला कळते काय? गाणारे पुरुष किंवा स्त्रियांचा आवाज मला अजूनही ऐकायला येतो काय? माझ्या स्वामीला त्यांचा सेवक एक ओझे म्हणून का असावा?

36आपला सेवक काही अंतरापर्यंत आपणाबरोबर यार्देन नदी पार करेल, पण राजाने मला त्याचा मोबदला याप्रकारे का द्यावा?

37आपल्या सेवकाला परत जाऊ द्या, की मी माझ्या नगरात, माझ्या पित्याच्या व आईच्या कबरेजवळ पुरला जाईन. परंतु आपला सेवक किमहाम येथे आहे. त्याला माझ्या स्वामीबरोबर पार जाऊ द्यावे, व आपणास जे योग्य वाटेल ते आपण त्याचे करावे.”

38राजाने म्हटले, “किमहाम माझ्याबरोबर पार जाईल आणि तुझ्या इच्छेनुसार मी त्याचे करेन. आणि जे मी तुला करावे असे तुला वाटते ते मी तुझ्यासाठी करेन.”

39तेव्हा सर्व लोकांनी यार्देन पार केली आणि मग राजाने पार केली. राजाने बारजिल्लईचे चुंबन घेऊन त्याला आशीर्वाद दिला आणि बारजिल्लई आपल्या घरी परत गेला.

40जेव्हा राजा यार्देन पार करून गिलगालकडे गेला, किमहाम सुद्धा त्यांच्याबरोबर गेला. यहूदाहचे सर्व सैन्य आणि इस्राएलच्या अर्ध्या सैन्यांनी दावीदाला पार नेले.

41लवकरच सर्व इस्राएली लोक दावीद राजाकडे येऊन त्यांना म्हणू लागले, “आमचे भाऊबंद, यहूदीयाच्या लोकांनी राजाला का चोरून नेले आणि त्यांना व त्यांच्या घराण्याला, त्यांच्या सैन्यासह यार्देन पार करून नेले?”

42यहूदीयाच्या सर्व लोकांनी इस्राएली लोकांना उत्तर दिले, “आम्ही असे केले, कारण राजा आमचा जवळचा नातेवाईक आहे. तुम्हाला त्याविषयी का राग यावा? राजाच्या सामुग्रीतील आम्ही काही खाल्ले आहे काय? आमच्यासाठी आम्ही काही घेतले आहे काय?”

43यावर इस्राएली लोकांनी यहूदीयाच्या लोकांना उत्तर दिले, “राजामध्ये आम्हाला दहा हिस्से आहेत; म्हणून दावीदावर तुमच्यापेक्षा आमचा हक्क मोठा आहे. मग तुम्ही आम्हाला का तुच्छ लेखता? आमच्या राजाला परत आणण्याविषयी प्रथम आम्ही बोलणे केले नाही काय?” परंतु यहूदीयाच्या माणसांनी इस्राएलच्या लोकांपेक्षा अधिक जोराने दावा केला.

स्रोत: Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

WEBREATH · 11:11

«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25

Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.

WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath