ख्रिश्चन धर्म
मागे

1 करिंथकरांस 7

तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे

1आता ज्या गोष्टींविषयी तुम्ही मला लिहिले होते: “मनुष्याने स्त्रीशी लैंगिक संबंध न ठेवलेले बरे.”

2तरी जारकर्म वाढले आहे म्हणून प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीशी संबंध ठेवावे आणि प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पतीशी.

3विवाहित स्त्री म्हणून असलेले सर्व हक्क पुरुषाने आपल्या पत्नीला द्यावेत, आणि पत्नीनेही आपल्या पतीसाठी तसेच करावे.

4पत्नीच्या शरीरावर तिचा स्वतःचा अधिकार नाही तर, पतीचा असतो. त्याचप्रमाणे पतीला स्वतःच्या शरीरावर अधिकार नसतो तर तो त्याच्या पत्नीला असतो.

5एकमेकांची वंचना करू नका, पण प्रार्थनेला वेळ मिळावा म्हणून एकमेकांच्या संमतीने काही काळ अलिप्त राहा. पण तुम्ही पुन्हा एकत्र यावे म्हणजे आत्मसंयमनाच्या अभावी सैतान तुम्हाला मोहात पाडणार नाही.

6मी हे आज्ञारूपाने म्हणत नाही परंतु अनुमती म्हणून सांगतो.

7माझी इच्छा अशी आहे की, जसा मी आहे तसे तुम्ही सर्वांनी असावे. परंतु प्रत्येकाला परमेश्वराकडून देणगी मिळालेली आहे; एकास एक देणगी तर दुसर्‍यास दुसरी देणगी.

8म्हणून जे अविवाहित आहेत आणि ज्या विधवा आहेत, त्यांना मी सांगतो तुम्हीही जसा मी आहे तसे राहावे.

9पण तुम्हाला संयम राखता येत नसेल, तर विवाह केलेला बरा. वासनेने जळण्यापेक्षा विवाह करणे उत्तम.

10आता जे विवाहित आहेत, त्यांच्यासाठी मी एक आज्ञा देतो (मी नाही, पण प्रभू देतात) पत्नीने पतीपासून विभक्त होऊ नये.

11पण पत्नी विभक्त झाली असेल, तर तिने दुसरा विवाह करू नये किंवा आपल्या पतीशी समेट करावा. पतीनेही आपल्या पत्नीला घटस्फोट देऊ नये.

12इतरांना मी हे सांगतो (प्रभू नव्हे, पण मी): एखाद्या भावाची पत्नी विश्वास ठेवणारी नसेल आणि ती त्याच्या जवळच राहण्यास तयार असेल, तर त्याने तिला घटस्फोट देऊ नये.

13त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीचा पती अविश्वासी असेल आणि तिच्याबरोबर राहण्यास तयार असेल, तर तिनेही त्याला घटस्फोट देऊ नये.

14कारण अविश्वासी पती, विश्वासणाऱ्या पत्नीद्वारे पवित्र होऊ शकेल आणि अविश्वासी पत्नी, विश्वासणाऱ्या पतीद्वारे पवित्र होऊ शकेल. नाही तर तुमची लेकरे अशुद्ध असती, परंतु ती आता पवित्र आहेत.

15परंतु जर अविश्वासी व्यक्ती वेगळी होऊ इच्छित असेल तर तसे होऊ द्या. अशा परिस्थितीत भाऊ किंवा बहीण बांधलेले नाही; कारण परमेश्वराने आपल्याला पाचारण केले आहे ते यासाठी की आपण शांतीने राहावे.

16अहो पत्नींनो, तुमच्या पतींचे तारण तुमच्याद्वारे होईल किंवा नाही हे कसे समजावे? किंवा पतींनो तुमच्या पत्नीचे तारण तुमच्याद्वारे होईल किंवा नाही हे कसे समजावे?

17प्रत्येकाने विश्वासू व्यक्तीसारखे प्रभूने तुम्हाला ज्या स्थितीत ठेवले आहे व परमेश्वराने जसे पाचारण केले आहे तसे राहावे. सर्व मंडळ्यांसाठी माझा हाच नियम आहे.

18सुंता झालेल्या एखाद्या व्यक्तीस पाचारण झाले आहे काय? तर तुम्ही असुंती होऊ नये. तसेच सुंता न होण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीस पाचारण झाले आहे का? तर त्याने सुंता करून घेऊ नये.

19सुंतेचे काही महत्त्व नाही व असुंतेचेही नाही. परंतु परमेश्वराच्या आज्ञा पाळणे हेच महत्त्वाचे आहे.

20एखाद्या व्यक्तीला परमेश्वराने पाचारण केले, त्यावेळी ज्या स्थितीत ते होते तसेच त्यांनी राहवे.

21तुम्ही गुलाम असताना पाचारण झाले काय? त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. पण तुम्हाला स्वतंत्र होणे शक्य असेल तर अवश्य व्हा.

22जर कोणी गुलाम असताना, प्रभूने तुम्हाला विश्वासात पाचारण केले, तर तुम्ही प्रभूमध्ये स्वतंत्र केलेली व्यक्ती आहात. त्याचप्रमाणे, जो स्वतंत्र असून पाचारलेला आहे तो ख्रिस्ताचा गुलाम आहे.

23तुम्हाला किंमत भरून विकत घेण्यात आले आहे; म्हणून तुम्ही माणसांचे गुलाम होऊ नका.

24माझ्या बंधूंनो व भगिनींनो, प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने पाचारण केले होते तेव्हा ज्या स्थितीत ते होते त्याच स्थितीत त्यांनी परमेश्वराला जोडलेले असावे.

25आता कुमारिकांबद्दल: मला प्रभूकडून आज्ञा मिळालेली नाही, तरीपण प्रभूच्या कृपेनुसार मी जो विश्वसनीय आहे तो मी माझा न्याय देतो.

26वर्तमान काळातील संकटामुळे, पुरुषांनी ज्या स्थितीत आहेत, त्या स्थितीत राहावे हे त्यांच्यासाठी योग्य होईल असे मला वाटते.

27तुमचा विवाह झाला आहे का? तर मुक्त होण्यास पाहू नका. तुम्ही अविवाहित आहात का? तर पत्नी शोधण्याच्या मागे लागू नका.

28परंतु जर तुम्ही विवाह केला, तरी तुम्ही काही पाप केले नाही आणि एखाद्या कुमारिकेने विवाह केला, तर तिनेही पाप केले नाही. जे विवाह करतात, त्यांना जीवनामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल; आणि तुमची त्यापासून सुटका व्हावी अशी माझी इच्छा आहे.

29बंधू व भगिनींनो, वेळ थोडा आहे. यापुढे ज्यांना पत्नी आहे त्यांनी आपल्याला पत्नी नाही अशाप्रकारे राहावे.

30जे विलाप करतात त्यांनी जणू काही तो केला नाही असे समजावे; जे आनंदित आहेत ते जणू काही आनंदी नाहीत असे समजावे; जे विकत घेतात, त्यांनी स्वतःचे काही नसल्यासारखे समजावे.

31जे ऐहिक गोष्टींचा उपभोग घेतात, त्यांनी त्यातच गर्क होऊन जाऊ नये, कारण सध्याचे जग लयाला जात आहे.

32तुम्ही चिंता विरहित असावे, अशी माझी इच्छा आहे. एखादा अविवाहित पुरुष प्रभूचे कार्य—प्रभूला कसे संतोषविता येईल, यासंबंधी काळजी करतो.

33तरी विवाहित पुरुष जगातील गोष्टींचा आणि आपल्या पत्नीला आनंदी कसे ठेवता येईल, याचा विचार करतो.

34त्याच्या आवडीनिवडी विभागल्या जातात. अविवाहित स्त्री वा कुमारिकेचे प्रभूला शरीराने व आत्म्याने संतुष्ट करण्याचे ध्येय असते, परंतु विवाहित स्त्री जगाच्या गोष्टींविषयी व आपल्या पतीला कसे संतोषवावे याकडे लक्ष देते.

35हे मी तुमच्या भल्यासाठी सांगत आहे, तुम्हावर निर्बंध घालण्यासाठी नव्हे, यासाठी की तुम्ही योग्यप्रकारे जीवन जगावे आणि तुमचे मन विचलित न होता प्रभूला पूर्णपणे समर्पित व्हावे.

36जर मागणी झालेल्या कुमारिकेशी एखादा मनुष्य आदरपूर्वक वागत नाही असे त्याला वाटले, आणि त्याच्या भावना अतितीव्र आहेत तर त्याने जे योग्य आहे ते करावे. त्यांनी लग्न करावे, केल्यास तो पाप करत नाही.

37परंतु एखाद्या माणसाचे मन स्थिर आहे व जो दडपणाखाली नाही व ज्याचा आपल्या शरीरावर ताबा आहे, त्याने कुमारिकेशी विवाह न करण्याचे ठरविले असेल, तर तो मनुष्य योग्य करतो.

38म्हणून मग जो पुरुष कुमारिकेशी विवाह करतो, तो चांगले करतो. परंतु जो विवाह करीत नाही तो अधिक चांगले करतो.

39पती जिवंत असेल तोपर्यंत पत्नी आपल्या पतीला बांधलेली आहे. पती मरण पावला, तर ती पाहिजे त्याच्याशी लग्न करण्यास मोकळी आहे, पण तो प्रभूमध्ये विश्वासू असावा.

40पण माझ्या मते ती जशी आहे तशी राहिली तर ती अधिक सुखी होईल—आणि मला असे वाटते की माझ्यातही परमेश्वराचा आत्मा वास करतो.

स्रोत: Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

WEBREATH · 11:11

«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25

Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.

WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath